Ad will apear here
Next
मुंबई पर्यटन : दादर, वरळी परिसर...
‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण भायखळा परिसराची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या दादर, वरळी परिसरातील पर्यटनस्थळांची....
...........
भायखळ्याच्या उत्तरेकडील भागात म्हणजे दादर, वरळी परिसरात पूर्वी कापडगिरण्या होत्या. त्यामुळे कामगार व जास्त करून मराठी कामगार वस्ती मोठी आहे. दादर हा भाग मुंबईची सांस्कृतिक ओळख देतो. तसेच अनेक राजकीय व सामाजिक चळवळींचे हे ठिकाण आहे. १९३७पर्यंत शिवाजी पार्क व आसपासचा परिसर विकसित झाला. ही सार्वजनिक जागा भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतच्या आंदोलनांनी गाजली, तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राजकारणाची साक्षीदार ठरली. १६व्या शतकात, हा परिसर खालचा माहीम (lower Mahim) म्हणून ओळखला जात असे. कारण ते मुंबईच्या सात बेटांपैकी एक असलेल्या माहीमच्या बेटावर स्थित होते. संपूर्ण पोर्तुगीज काळात ते बेट सर्वांत महत्त्वाचे होते. पोर्तुगीज फ्रान्सिस्काने १५९६मध्ये नोसा सेन्होरा डे साल्वाओ नावाचे एक चर्च बांधली, जे आज ‘पोर्तुगीज चर्च’ म्हणून ओळखले जाते. मध्य मुंबई, मुंबई उपनगरे आणि दूरच्या शहरांच्या रहिवाशांसाठी दादर पश्चिमेकडील बाजार हे खरेदीचे लोकप्रिय ठिकाण आहे. पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागांत महिला आणि मुलांच्या कपड्यांच्या दुकानांची रेलचेल आहे. 

सिद्धिविनायक, प्रभादेवीश्री सिद्धिविनायक गणपती मंदिर : प्रभादेवी भागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील हे मंदिर गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. आसपास राहणाऱ्या काही लोकांचा रोज दर्शन घेण्याचा शिरस्ता आहे, तर काही जण चतुर्थीला येथे येतातच. अनेक राजकीय मंडळी निवडणुकीचा फॉर्म भरण्यापूर्वी येथे येतात. अभिनेते, निर्माते चित्रपटनिर्मिती व प्रदर्शनापूर्वी देवदर्शनासाठी येतात. नवपरिणित जोडपीही येतात. देव दर्शनाने सकारात्मक ऊर्जा नक्कीच निर्माण होते. 

या मंदिरात एक छोटासा मंडप आहे. गर्भागृहातील लाकडी दाररावर महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. गर्भागृहातील आतील छप्पर सोन्याने मढवले गेले आहे. गर्भागृहात गणेशाची मध्यवर्ती प्रतिमा ठेवण्यात आली आहे. या मूर्तीमध्ये चार हातांमध्ये अनुक्रमे कमळ, परशू, मोदक आणि आशीर्वाद देणारा वरदहस्त आहे. रिद्धी आणि सिद्धी या दोन्ही देवी-देवता पवित्रता, पूर्ती, समृद्धी आणि श्रीमंत असल्याचे दर्शवितात. 

श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या वरच्या मजल्यांमध्ये निवासी खोल्यांचा समावेश आहे. परिसरामध्ये हनुमान मंदिरही आहे. हे मंदिर भक्तांकडून येणाऱ्या देणग्यांमुळे श्रीमंत देवस्थान समजले जाते. मंदिराचा कारभार विश्वस्तांमार्फत चालविला जातो. देवस्थान संस्थेमार्फत अनेक लोकोपयोगी कामांसाठी देणग्या दिल्या जातात. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना मदतही दिली जाते. 

प्रभादेवी मंदिर : हे प्रभादेवी भागातील जुने मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती कर्नाटकातील असून, १२व्या शतकातील आहे. सध्याचे मंदिर सन १७१५मधील आहे. इतिहासकारांच्या मते प्रभादेवी मंदिरातील मुख्य देवता मूळतः शाकंभरी देवी म्हणून संबोधली जात असे. बिंबाराजा यादव याची ती कुलदेवी होती. स्थानिक लोककथांनुसार, प्रभावती देवी पाठारे प्रभू समाजातील श्याम नायक नावाच्या भक्ताच्या स्वप्नात दिसली व त्यानेच हे मंदिर बांधले. 

शिवाजी पार्क

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान :
हे मैदान ‘शिवतीर्थ’ म्हणूनही ओळखले जाते. समुद्राच्या सान्निध्यात असलेले हे उद्यान १९२५मध्ये महापालिकेमार्फत उभारले गेले. तत्कालीन नगरसेविका अवंतिका गोखले यांच्या मागणीवरून मैदानाचे नाव छत्रपती शिवाजी पार्क ठेवण्यात आले. या ठिकाणी १९२७मध्ये दादर हिंदू जिमखान्यामार्फत पहिले टेनिस कोर्ट स्थापन करण्यात आले. सुमारे २७ एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर हे मैदान विस्तारले आहे. यातील निम्म्याहून अधिक क्षेत्र सुमारे ३१ संस्थांच्या ताब्यात आहे. त्यात शिवाजी पार्क जिमखाना आणि बंगाल क्लब यांसारखे सर्वांत मोठे क्लब आहेत. उर्वरित जागेवर खेळांचे मैदान, मुलांचे पार्क, नाना-नानी पार्क, स्काउटचे मंडप, एक गणेश मंदिर आणि ग्रंथालय यांचा समावेश आहे. संपूर्ण मैदानाच्या बाजूने वृक्षराजीच्या असलेला बांधीव पादचारी मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरेख पुतळा येथे आहे. पूर्वेकडील उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार फक्त पादचाऱ्यांसाठी आहे. या प्रवेशद्वारावर शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्या दिवंगत पत्नी मीनाताई ठाकरे यांचा दिवा ठेवण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्यावर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. या मैदानाने अनेक ऐतिहासिक सभा पाहिल्या.

शिवाजी पार्कमधील शिवाजी महाराजांचा पुतळा

१९१०नंतर मात्र नागरिकांनी केलेल्या जनहितयाचिकेमुळे हे मैदान शांतात क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. शिवाजी पार्कवरून केळुस्कर मार्गावरील कोहिनूर चौकासमोरच शिवसेनेचे मुख्यालय आहे. तसेच राम गणेश गडकरी यांचे स्मारकही आहे. शिवाजी पार्क मैदान भारतीय क्रिकेटचे जन्मस्थळ मानले जाते. दिवंगत अण्णा वैद्य आणि रमाकांत आचरेकर यांच्यासारख्या प्रशिक्षकांनी जोपासलेले क्रिकेट क्लबचे हे घर आहे, ज्यांनी भारतासाठी अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स तयार केले आहेत. यामध्ये मुंबईमधील सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, सुहास गुप्ते, विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, बाळू गुप्ते, एम. एस. पाटील, दिलीप सरदेसाई, अशोक वाडेकर, पद्माकर शिवलकर, एकनाथ सोलकर, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, संदीप पाटील, अजित आगरकर, प्रवीण अमरे, विनोद कांबळी आणि संजय मांजरेकर अशी कितीतरी नावे घेता येतील. 

चैत्यभूमी स्तूप

दादर चौपाटी :
शिवाजी पार्कपासून अगदी जवळ ही चौपाटी आहे. हा एक छोटा किनारा आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे. लोक येथे सूर्यास्त दृश्य आणि वांद्रे-वरळी सीलिंक पुलाचे सुंदर दृश्य पाहण्यास येतात. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर सागरी सेतूवरील पथदिव्यांच्या प्रकाशाने आसमंत उजळून जातो. वांद्र्यापासून वरळीपर्यंत सागरी सेतू असल्याने समोर आकाशदिव्यांची माळ असल्यासारखे वाटते.

चैत्यभूमी प्रवेशद्वार, अशोकस्तंभचैत्यभूमी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चैत्यभूमी उभारण्यात आली. बौद्ध स्तूप आणि चैत्य स्वरूपात हे स्मारक आहे. या ठिकाणी सहा डिसेंबर १९५६ या दिवशी डॉ. आंबेडकरांना लाखो अनुयायांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. त्यानंतर सहा डिसेंबर या दिवशी चैत्यभूमीवर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दर वर्षी लाखोंच्या संख्येने लोक येत असतात. हे एक चैत्यस्मारक असून, तेथील स्तूप आंबेडकरवादी जनतेचे आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. चैत्यभूमी स्तूपाच्या आतील भागात बुद्धमूर्ती व बाबासाहेबांचा पुतळा ठेवण्यात आला आहे. एका चौरस दालनावर एक लहान घुमट असे चैत्यभूमीचे रूप आहे. हे दालन जमिनीवर आणि तळमजल्यात विभागले आहे. चौरस आकाराच्या संरचनेत दीड मीटर उंचीची वर्तुळाकार भिंत आहे. वर्तुळामध्ये संगमरवरी फरशीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा आणि गौतम बुद्धाची मूर्ती आहे. वर्तुळाकार भिंतीत दोन दरवाजे आहेत. तळमजल्यावर एक स्तूप आहे आणि तेथे भिक्खूंसाठी विश्रांतीची जागा आहे. चैत्यभूमीचे मुख्य प्रवेशद्वार सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराप्रमाणेच उभारण्यात आले आहे. तसेच अशोकस्तंभाची प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे. चैत्यभूमीचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्नुषा मीरा आंबेडकर यांनी पाच डिसेंबर १९७१ रोजी केले. 

वरळी किल्ला

वरळी किल्ला :
वरळी हा दादरचे दक्षिणेकडील एक परिसर आहे. बहुधा वारली या शब्दावरून हे नाव आले असावे. वरळी येथे किल्ल्याची बांधणी पोर्तुगीजांनी १५६१ साली केली. खाली रुंद व वर निमुळत्या तटबंदीच्या भिंती, त्यावर त्रिकोणाकृती बुरुज आणि ह्या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी मनोरा इत्यादी पोर्तुगीज स्थापत्याची वैशिष्ट्ये ह्या किल्ल्यात दिसून येतात. मुंबई बेट पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे हस्तांतरित झाले, त्या वेळी ह्या किल्लाचा ताबा ब्रिटिशांना मिळाला. ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या दरम्यान सप्तवार्षिक युद्धात वरळी किल्ल्यावर जादा शिबंदी आणि तोफा ठेवण्यात आल्या होत्या, असे उल्लेख मिळतात. वरळी कोळीवाड्यातील छोट्याशा रस्त्याने किल्ल्यापर्यंत जाता येते. किल्ल्याच्या दरवाज्याकडे जाणाऱ्या पायऱ्या सुरुवातीला जोत्याच्या उंचीपर्यंत आणि नंतर दरवाज्याच्या उंचीपर्यंत जातात. त्यामुळे भारदस्त वाटते. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात चौकोनी विहीर आहे. विहिरीचा आतील भाग तोंडाच्या आकारापेक्षा मोठा असून, विहिरीला वर्षभर पाणी असते. पोर्तुगीजांनी मुंबई परिसरात बांधलेल्या किल्ल्यांपैकी गोड्या पाण्याची विहीर असलेला हा एकमेव किल्ला आहे. तटबंदीवर खाचा ठेवून तोफा ठेवण्यासाठी जागा करण्यात आलेली दिसून येते. वांद्रे-वरळी सी-लिंकवरून जाताना ह्या किल्ल्यावरील मनोरा लक्ष वेधून घेतो, घंटा बांधण्यासाठी हा मनोरा बांधला होता. 

वरळी किल्ला घंटाघर मनोरा

पिरामल संग्रहालय :
हे वरळी भागात मध्यभागी असलेले एक अत्याधुनिक संग्रहालय आहे. येथे प्रेक्षकांना आकर्षक, माहितीपूर्ण आणि शिक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त कलांचे सादरीकरण केले जाते. या संग्रहालयात नियमितपणे पिरामल संग्रहातील आणि इतर संग्रहातून आलेल्या नावीन्यपूर्ण कलाकृती पाहायला मिळतात. पिरामल आर्ट फाउंडेशन ही डॉ. स्वाती पिरामल आणि अजय पिरामल आणि पिरामल कुटुंबीयांनी भारतीय कलेचा संग्रह, जतन आणि प्रदर्शन यांसाठी स्थापन केलेली संस्था आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून कलेबद्दल दुर्मीळ माहिती असलेले ग्रंथालयही चालवले जाते. फाउंडेशन आर्काइव्हल प्रोजेक्ट्स, आर्टस् मॅनेजमेंट प्रोग्राम आणि महत्त्वपूर्ण ललित कला प्रदर्शनांना नियमितपणे प्रोत्साहन दिले जाते.

वांद्रे-वरळी सी-लिंक

वांद्रे-वरळी सागरी मार्ग :
हा मुंबई शहरामधील एक महत्त्वाचा, पहिला सागरी पूल आहे. हा पूल मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईतील वरळी येथे जोडतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला ५.६ किलोमीटर लांबीचा हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला असून, याचे संकल्प चित्र डीएआर कन्सल्टंट्स या कंपनीने तयार केले आहे. ह्या पुलाच्या बांधकामासाठी १ ६०० कोटी रुपये इतका खर्च आला असून, ३० जून २००९ रोजी वांद्रे-वरळी सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा पूल मुंबई आणि भारतातील स्टील वायर वापरून केलेला पहिला पूल आहे. या पुलावरील दिव्यांसाठी नऊ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्याचे बांधकाम करण्यासाठी ३६ हजार किलोमीटर स्टीलच्या दोऱ्या, पावणे सहा लाख टन सिमेंट काँक्रीट वापरण्यात आले आहे. चार हजार कामगार येथे काम करत होते. या पुलामध्ये वापरल्या जाणाऱ्या खास स्टीलच्या तारा चीनकडून घेतल्या गेल्या. या तारांवर विशेष रंगासह, त्या गंजण्यापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिकचे आच्छादनही देण्यात आले आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव या पुलाला देण्यात आले आहे. वांद्रे-वरळी सागरी मार्गाच्या उत्तर टोकापासून पश्चिम द्रुतगती महामार्गाची सुरुवात होते. १९९९मध्ये शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचा पायाभरणी सोहळा पार पडला. असंख्य अडथळे पार करीत १० वर्षांनंतर हा पूल पूर्ण झाला. या पुलामुळे वांद्रा-वरळी हा प्रवास १० ते १५ मिनिटांत पूर्ण होतो. पूर्वी त्यासाठी ५० ते ६० मिनिटे लागायची. तसेच अनेकदा वाहतूककोंडीही व्हायची. हे एक पर्यटन केंद्रही झाले आहे. 

वांद्रे-वरळी सी-लिंक

वरळी समुद्रकिनारा :
सुमारे साडेतीन किलोमीटर लांबी असलेला हा सुंदर किनारा आहे. भरपूर लांबी असल्यामुळे येथे खूप मोकळे जाणवते. येथे वाळूत खेळण्यासाठी जागा नाही. समुद्राच्या लाटा संरक्षक कठड्यावर आपटत असतात. फेरीवाल्यांची गर्दी नसते. येथे कुल्फी छान मिळते. संपूर्ण किनारा बांधलेला आहे. त्याला बांधीव कठडा आणि प्रशस्त चेकर्डने झाकलेला पादचारी मार्ग आहे. बसायला बाके आहेत. संध्याकाळी व सकाळी चालण्याचा व्यायाम करण्यासाठी भरपूर लोक येथे येत असतात. सागरी पुलावरील विद्युत रोषणाईमुळे याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. पावसाळ्यात मोठ्या भरतीच्या लाटा बघण्यासाठी येथे गर्दी होते. सूर्यास्ताच्या वेळी वातावरण खूपच आल्हाददायक असते. आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनचा पुतळा येथे एका बाकावर बसविण्यात आला आहे. त्याच्या शेजारी बसून सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी असतेच. समुद्राच्या समोरच असलेला पांढऱ्या शुभ्र रंगाचा सर जीजीभॉय यांचा टुमदार बंगलादेखील आपले लक्ष वेधून घेतो. पुढे गेलो, की वरळी सी लिंककडे जाणारा मार्ग आहे. तेथे त्यामुळे प्रचंड रहदारी असते. याच परिसरात आरेची ‘वरळी दुग्धशाळा’ असून, हे लहान मुलांच्या सहलीचं ठिकाण आहे. 

कॉमन मॅनचा पुतळा

कॉमन मॅनचा पुतळा

कसे जाल दादर, वरळी भागात?
या भागात दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकावरून बेस्ट बसने जाता येते. उपनगरातून थेट बस व टॅक्सी सेवाही आहे. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

वांद्रे-वरळी सी-लिंक

शिवाजी पार्क परिसर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZUPCF
 Thanks Farch Chan mahiti milali1
 सुरेख माहितीपर लेख.
नेहमीच पहात आले आहे सगळं....पण इतिहास आता कळतोय1
Similar Posts
मुंबई पर्यटन : दादर, परळ, वडाळा परिसर ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण दादरच्या मध्यवर्ती भागासह वरळीपर्यंतचा भाग पाहिला. आजच्या भागात माहिती घेऊ या दादर पूर्व ते परळ, वडाळ्यापर्यंतच्या पर्यटनस्थळांची.
मुंबई पर्यटन : राजभवन, वाळकेश्वर आणि परिसर... ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण मुंबईतील गिरगाव आणि मलबार हिल परिसरातील काही ठिकाणे पाहिली. आजच्या भागात मलबार हिलवरील वाळकेश्वर, राजभवन यांसह अन्य ठिकाणांची माहिती घेऊ या.
मुंबई पर्यटन : माहीम, सायन, धारावी ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात मुंबईतील दादर, परळ वगैरे भागाची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या माहीम, सायन (शिव) आणि धारावी.
मुंबई पर्यटन : भायखळा परिसर ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण मुंबईतील ब्रीच कँडी, महालक्ष्मी परिसर पाहिला. या भागात पाहू या भायखळा परिसरातील ठिकाणे. त्यात राणीची बाग, भाऊ दाजी लाड संग्रहालय, रॉयल ऑपेरा हाउस अशा स्थळांचा समावेश आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language